महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाऊस लांबला तरी गोव्यामध्ये पाण्याची टंचाई भासणार नाही - मुख्यमंत्री सावंत

खाण खंदकातील पाणी कायमस्वरूपी वापरता यावे. यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By

Published : Jun 11, 2019, 2:23 PM IST

पणजी- पाऊस लांबणीवर गेला तरी गोव्याला पुरेसा पाणीपुरवठा करता येईल एवढा साठा राज्यातील ४ प्रमुख धरणात उपलब्ध आहे. तसेच चार खाण खंदकातून पाणी उपसा करून जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरविले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. पणजीतील 'महालक्ष्मी' या मुख्यमंत्री निवासस्थानी जलस्त्रोत विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात ९ ठिकाणी जलशुद्धीकरण केले जाते. यामध्ये दररोज ६५० एमएलडी पाणी शुद्ध केले जाते. त्यामधून ६३० एमएलडी पाणी वापरण्यायोग्य मिळते. त्यापैकी ५८४ एमएलडी पाण्याचा उपयोग होतो. ९० टक्के घरगुती, तर १० टक्के पाणी अन्य कामांसाठी वापरले जाते. त्याशिवाय ३० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरवला जातो. तसेच सोमेश्वर, सडा, सातलण आणि कोडाली या ४ खाण खंदकातून २४ तास पाणी उपसा करून जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरवले जाते. त्यामुळे गोव्याला आज घडीला पाण्याची कमतरता नसल्याचे सावंत म्हणाले. तसेच खाण खंदकातील पाणी कायमस्वरूपी वापरता यावे. यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या वापरात असलेल्या चार खाण खंदकांबरोबरच अन्य ठिकाणी असलेल्या अशा खंदकांचा शोध घेतला जाईल. यासाठी केंद्रीय खाण मंत्र्यालय, पर्यावरण मंत्रालयाशी संपर्क साधून हे खंदक बंद न करता कायमस्वरूपी पाणी वापरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येईल. यासाठी शिष्टमंडळ पाठवण्यात येणार आहे. त्याबरोबरच पाण्याचा साठा वाढावण्यासाठी पुढील हंगामात राज्यभरात लोकसहभागातून बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी काही ठिकाणी गरज भासल्यास ड्रेझिंग करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोणत्या धरणातील पाणीसाठी किती दिवस पुरेल?

  1. साळावली - ४४ दिवस
  2. अंजुणे - १९ दिवस
  3. आमठाणे - १२५ दिवस
  4. चाफोली - ४० दिवस

मांडवीचे पाणी वळविण्याचा परिणाम नाही

गोव्याची मुख्य जलवाहिनी मांडवी नदीचे पाणी कर्नाटकने वळवले. त्याचा परिणाम गोव्यातील जलसाठ्यावर झाला असे वाटते का? असे विचारले असता मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, काही अंशी शक्यता आहे. मात्र, त्यांनी केवळ दोनच नाले वळविले आहेत. त्यामुळे त्याचा जास्त परिणाम झालेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details