गुरुग्राम -हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर जिल्हा कष्ट निवारण समितीची बैठक घेण्यासाठी गुरुग्राममध्ये पोहचले. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. शेतकरी आंदोलन हे पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. हरयाणाच्या शेतकऱ्यांचा या आंदोलनात सहभाग नाही. या आंदोलनाचे खालिस्तानी कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे. याची संपूर्ण तपासणी करण्याची गरज आहे. तसेच उद्भवलेल्या संपूर्ण परिस्थितीला मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह जबाबदार आहेत, असे खट्टर म्हणाले.
शेतकरी आंदोलनावर हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य 'दिल्ली चलो' आंदोलनात हरयाणाच्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. हे आंदोलन पंजाबच्या राजकीय पक्षांनी आणि काही संघटनांनी सुरू केले. ज्या प्रकारची घोषणाबाजी केली जात आहे, त्यावरून या आंदोलनाचे खालिस्तानी कनेक्शन असू शकते. इंदिरा गांधींना आम्ही मारू शकतो तर, मोदींना का नाही, अशी घोषणाबाजी केली जात आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे खट्टर म्हणाले.
शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकीय पक्ष आपल्या पोळ्या भाजण्याचे काम करत आहेत. चर्चेसाठी तयार असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी द्यावी. चर्चेतून काही मार्ग काढता येईल. कारण चर्चेतून तोडगा निघू शकतो. तसेच आम्ही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते चर्चा करण्यास तयार नाहीत. गेल्या 6 वर्षांत पहिल्यांदा असे होत आहे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे दिल्ली चलो आंदोलन -
कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीत आंदोलन करत असून सिंघू आणि टिक्री सीमेवर पोलिसांनी आंदोलकांना अडवून धरले आहे. शेतकऱ्यांनी उत्तर दिल्लीतील बुरारी येथील संत निरंकारी मैदानावर आंदोलन करावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. पंजाब आणि हरयाणातून मोठ्या प्रमाणात शेतकरी सिंघू सीमेवर जमा होत असून पोलिसांचाही फौजफाटा तेथे तैनात आहे. शेतकरी आंदोलकांना थांबवण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पोलीस वॉटर कॅननचा वापर करत आहेत.