कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सर्व विरोधक एकत्र येवू आणि भाजपला एकटे पाडू, असे ममता म्हणाल्या. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात काढलेल्या रॅलीमध्ये त्या बोलत होत्या.
देश हा येथे राहत असलेल्या प्रत्येक नागरिकाचा आहे. पश्चिम बंगालमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येकाला येथे राहण्याचा हक्क आहे. फक्त आपली नावे कोणत्याही त्रुटीशिवाय मतदार यादीमध्ये आहेत का, याची खात्री करुन घ्या. राज्यातील कोणत्याच व्यक्तीला बाहेर काढले जाणार नाही. हे माझे वचन आहे, असे ममता म्हणाल्या.देशभरामध्ये सीएएविरोधात आंदोलन होत आहेत. देशातील विद्यार्थांनी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला आहे. 18 वर्ष पूर्ण झालेले तरूण मतदान करून पंतप्रधान निवडू शकतात. मात्र आपले मत मांडण्याचा त्यांना अधिकार दिला जात नाही. हीच लोकशाही आहे का, असा सवाल ममता यांनी उपस्थितीत केला. यापूर्वी ममता यांनी देशात चाललेल्या अशांततेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले होते. लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले होते. ममता यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधी भूमिका घेतली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये ममता सर्वात पुढच्या स्थानी आहेत. मागील आठवड्यातही त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते.