सोनीपत(हरयाणा) - विशालनगर भागात राहणाऱ्या मोहित नावाच्या एका व्यक्तीबद्दल हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एक ट्विट केले होते. मोहितला २०१०मध्ये कॅन्सर झाला होता. पायातील कॅन्सर काढून डॉक्टरांनी त्याच्या पायात लोखंडी रॉड टाकले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या एका अपघातात त्याचा पाय तुटला आणि तो पाय कापावा लागला. एवढ्या आघातांना सामोरे गेल्यानंतरही मोहित हिंमत न हारता बॉडी बिल्डर बनला आणि अनेक पुरस्कार नावावर केले.
हरयाणाचा दिव्यांग मोहित अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत; मुख्यमंत्र्यांनी ट्विट केला व्हिडिओ यूट्युबवरचे व्हिडीओ पाहून मिळाली प्रेरणा -
मोहितचे शिक्षण १२वीपर्यंत झाले आहे. त्यानंतर त्याने लॅब टेक्निशियनचा कोर्स केला. मोहित ११ वर्षांचा असताना त्याला बोन मॅरो कॅन्सर झाला. डॉक्टरांनी त्याचा कॅन्सर काढून पायात लोखंडी रॉड टाकले. मात्र, २०१५मध्ये पुन्हा त्याला कॅन्सर झाला आणि त्यानंतर एका अपघातात त्याचा तोच पाय तुटला. त्यामुळे डॉक्टरांना त्याचा पाय कापावा लागला. मोहित रुग्णालयात कॅन्सरचा सामना करत असताना यूट्युबवर बॉडी बिल्डिंगचे व्हिडिओ पाहायचा. ते व्हिडिओ पाहून त्याला प्रेरणा मिळाली आणि कठोर परिश्रम करून तो बॉडी बिल्डर झाला.
गेल्या ९ ऑक्टोबरला हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी तरुणांना संदेश देताना मोहितचा व्हिडिओ ट्विट केला होता. मोहित आत्मनिर्भर असून ते अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरू शकतात, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते.
बॉडी बिल्डींग करताना खाण्या-पिण्यासह अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. त्याचा खर्च परवडणारा नसल्याचे मोहित सांगतो. ईटीव्ही भारतशी बोलताना मोहितने सरकारकडे नोकरीची मागणी केली आहे. नोकरी मिळाल्यास तो स्वतःचा खर्च भागवू शकेल आणि स्वप्ने पूर्ण करू शकेल. फक्त एकच पाय असल्याने मोहितला दुसरीकडे नोकरीवर घेत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.