नवी दिल्ली- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एका आठवड्यासाठी दिल्लीच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डिजीटल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाकी राज्यांप्रमाणेच आपणही हा निर्णय घेतला असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. एका आठवड्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींनाच शहरात ये-जा करता येणार आहे.
यापुढील निर्णय जनतेचा...
यापुढेही दिल्लीच्या सीमा बंद ठेवाव्यात की नाही याबाबत जनतेचा कौल घेतला जाणार आहे. शुक्रवारपर्यंत एका व्हॉट्सअप नंबरवर दिल्लीमधील नागरिक आपले मत सांगू शकतात, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. यासोबतच दिल्लीमधील रुग्णालयांमध्ये केवळ दिल्लीमधील नागरिकांवर उपचार केले जावेत, की बाहेरच्या राज्यातील लोकांवरही उपचार केले जावेत याबाबतही लोकांचे मत त्यांनी मागितले आहे.