नवी दिल्ली :दिल्लीच्या सिंघू सीमेवर असलेल्या गुरू गोविंद सिंह स्मारकाला रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भेट दिली. यावेळी त्यांना आंदोलक शेतकऱ्यांचीही भेट घेतली. तसेच, कीर्तनाच्या कार्यक्रमालाही उपस्थिती दर्शवली. याठिकाणी बोलताना केंद्र सरकारने कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी केजरीवाल यांनी याठिकाणी बोलताना केली.
दिल्ली सरकारच्या पंजाब अकादमीने याठिकाणी कीर्तनाचे आयोजन केले होते. या अकादमीचे चेअरमन हे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आहेत. याठिकाणी उपस्थिती दर्शवत केजरीवाल आणि सिसोदिया यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्येही सहभाग नोंदवला. तर सीमेवरील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री अरविंद हे स्वतः ठिकठिकाणी जाऊन त्याबाबतच्या नियोजनाची पाहणी करत असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले.