शिमला- दसऱ्याच्या मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उल्लेख न करता अभिनेत्री कंगना राणौतवर टीका केली होती. टीकेत त्यांनी गांजाची शेती होणारे राज्य म्हटल्याने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले, की उद्धव ठाकरेंना माहित हवे, की हिमाचल ही देवभूमी आहे. हिमाचल प्रदेश छोटे राज्य असले तरी विविध क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा परिस्थितीत हिमाचल प्रदेशाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अभिनेता कंगना रणौतने सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली आहे. कंगना रणौतने मुंबईला पाकव्याप्त महाराष्ट्र म्हटल्यानंतर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तिच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. सतत मुंबई आणि महाराष्ट्र राज्याची बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनाचे नाव न घेता तिचा चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
काही लोक मुंबईला पोट भरण्यासाठी येतात. त्यानंतर पाकव्याप्त म्हणून मुंबईला शिवीगाळ करतात. येथे प्रत्येक ठिकाणी ड्रग्ज घेणारे लोक आहेत, अशा प्रकारचे चित्र तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहित नाही, आमच्या दारात तुळशीचे वृदांवन असते. गांजा नाही. सगळ्यांना नाही की गांजाची शेती कुठे करतात? यामधून त्यांनी कंगनाचे राज्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये गांजाची शेती केली जात असल्याचे सूचित केले होते.