शिमला - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना दिल्लीमध्ये सीएए, एनआरसीसंबधी हिंसाचार उफाळला आहे. सत्ताधारी भाजपकडून विरोधकांवर टीका करण्यात येत असून हा त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. दिल्लीतील परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लक्ष ठेवून आहेत. देशाच्या विरोधात बोलणारे आणि विनाकारण वातावरण बिघडवणाऱ्यांच्या विरोधात आता सक्तीने कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले.
भारतात भारत माता की जय म्हणणारा राहील आणि जो असे बोलणार नाही, जे भारताचा विरोध करतील, संवैधानिक व्यवस्थेवर वारंवार हल्ले चढवणाऱ्यांचा आता विचार करण्याची गरज आहे, असे ठाकूर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दरम्यान, दिल्लीच्या भडनपुरा आणि मौजपूरमध्ये सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये दंगल झाल्याने आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.