नवी दिल्ली - सीबीएसईच्या १२वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल १० ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी लावणार असल्याची माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वकिलांनी नविन शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेण्याची अंतिम तारिख ३१ ऑक्टोबर असल्याचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सांगितले होते. त्यांचे म्हणणे मान्य करत मंगळवारी सुप्रीम कोर्टाने सीबीएसईला विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यास सांगितले होते. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होवू नये, तसेच विद्यार्थ्यांना शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करता येईल, अशी व्यवस्था करण्याचे आदेश खंडपीठाने सीबीएसई आणि यूजीसीला दिले होते.
तत्पूर्वी, परीक्षा या मंगळवारपासून सुरू होतील आणि 29 सप्टेंबर रोजी संपतील. जर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया निकाल जाहीर होण्यापूर्वी संपत असेल तर विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्ष धोक्यात येवू शकते, असे याचिकाकर्त्यांचे वकील विवेक तंखा यांनी खंडपीठासमोर सांगितले होते.