चैन्नई -चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर असून आज त्यांचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची अनौपचारिक भेट संपली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ५० मिनिटे चर्चा झाली आहे. तुमच्या आदरतिथ्याने आम्ही भारावून गेलो आहोत. हा अनुभव आमच्यासाठी कायम आठवणीत राहील, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. दरम्यान दोन्ही देशाचे प्रतिनिधीमंडळ चर्चा करत आहे. यामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सहभागी झाले आहेत.
गेल्या २ हजार वर्षाच्या कालखंडामध्ये भारत आणि चीन जगातील प्रमुख आर्थिक शक्ती राहिले आहेत. ती स्थिती आपण पुन्हा प्राप्त करू शकतो. आपल्या दरम्यान असलेले मतभेद दोघांच्या सहमतीने सोडवण्यात येईल. आपले संबंध जगामध्ये शांतता प्रस्थापीत करतील, वुहानमध्ये झालेल्या भेटीमुळे आपल्या नात्यामध्ये मजबूती आल्याचं मोदी म्हणाले. ही बैठक अनौपचारिक असून दोन्ही देश वेगवेगळे पत्रक जारी करतील. यापूर्वी २०१८ मध्ये चीनमधील वुहान शहरात अनौपचारिक बैठक झाली होती.