नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराची सुरवात चीनमधील वूहान येथून झाली होती, त्यामुळे कोरोनाविषाणूला चिनी विषाणू असेही म्हटले जात आहे. त्यावरून चीनचे राजदूत सुन वीदोंग यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. 'कोरोनाला चीनी विषाणू संबोधू नये, त्यामुळे चीनची प्रतिमा मलीन होईल', असे म्हटले आहे.
कोरोना विषाणूला चीनी विषाणू संबोधन हे अस्वीकार्य असून आंतरराष्ट्रीय सहकार्यास हानिकारक ठरणार आहे. भारत अशा मानसिकतेला पाठिंबा देणार नाही आणि त्याचा विरोध करेल, अशी आशा आहे, असे चीनचे राजदूत सुन वीदोंग यांनी म्हणाले.
भारतामध्ये कोरोनाविषाणूचा प्रसार वाढत आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत आम्ही भारतासोबत आहोत. कोरोनाचा प्रसार थांबवण्यात भारताला यश येईल, याचा आम्हाला विश्वास आहे. चीन आणि भारत या दोन्ही उभय देशांनी एकमेकांना सहकार्य करून जागतिक सार्वजनिक आरोग्य संरक्षीत केले पाहिजे, असे चीनचे राजदूत सुन वीदोंग यांनी म्हटले आहे.
डिसेंबरमध्ये चीनमधील हुबेई प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. त्यानंतर जगभरात या विषाणूचा प्रसार झाला आहे. पहिल्या रुग्णांची पुष्टी चीनमध्ये झाल्याने विषाणूला चिनी विषाणू म्हटले जात आहे. विषाणूला देशाचे नाव दिल्यास तो प्रदेश कलंकित होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोना विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने COVID-१९ असे नाव दिले आहे. असे करण्यामागे जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली आहे. त्यानुसार हे नाव देण्यात आले आहे.