नवी दिल्ली- लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयला सुत्रांनी ही माहिती दिल्याची माहिती दिली.
मागील कित्येक दिवसापासून भारत व चीनमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यातील प्रदेशावरून तणाव होता. उभय देशांमध्ये गेल्या आठवड्यात चर्चाही झाली होती. हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सोमवारी रात्री हिंसक चकमक झाली. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितले आहे. पण यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झाले.
उभय देशांमधील तैनात सैनिकांमध्ये चकमक होऊन भारतीय लष्करातील एक कर्नल व दोन जवानांना वीरमरण आले. दरम्यान, यावेळी भारतीय सैन्य दलाच्या दणक्याने चीनचेही जवळपास ४३ जवान ठार तसेच अनेक गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयकडे सुत्रांनी ही माहिती दिल्याचे सांगितले. मात्र, याबाबत चीनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या जवानांना एअरलिफ्ट करण्यासाठी वास्तविक नियंत्रण रेषेवर हेलिकॉप्टर्सची हालचादेखील वाढली असल्याचे सुत्रांकडून समजले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर उभय देशांमधील मेजर जनरल दर्जाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू झाली होती, असे लष्करी सूत्रांनी सांगितले होते. भारतीय लष्कराकडून मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास पत्रकार परिषद होणार होती, पण ती रद्द करण्यात आली होती. मागील ४५ वर्षांमधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, असेही एका लष्करी सूत्राने स्पष्ट केले.