नवी दिल्ली -पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिणेला चिनी घुसखोरीला रोखण्यासाठी भारतीय सैन्याने मोक्याच्या ठिकाणांवर कब्जा मिळविला आहे. यानंतर भारतीय लष्कराला मागे ढकलण्यासाठी चिनी लष्कराकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, भारतीय लष्कारने संयमी भूमिका घेत चिनी सैन्याला पुढे येण्यापासून रोखले आहे. यावेळी चीनने गोळीबारही केला होता. आता चीनने पँगाँग सरोवराच्या उत्तरेला सैन्याची आणि लष्करी सामग्रीची जमवाजमव सुरू केली आहे.
मागील चार महिन्यांपासून भारत चीनमध्ये पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर वाद सुरू आहे. चीनने आक्रमक भूमिका घेत गलवान खोऱ्यातील पहाडी भागात कब्जा मिळविला आहे. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवानही शहीद झाले. त्यानंतर वातावरण आणखीनच तापले. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी लष्कराने पँगाँग लेकच्या दक्षिण भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने आधीच पावले उचलत महत्त्वाच्या पहाडी ठिकाणांवर ताबा मिळवला.