नवी दिल्ली -संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये (यूएनएससी) काश्मीर मुद्दा पुढे आणण्यासाठी चीन पाकिस्तानला मदत करत आहे. या मुद्द्यावरून भारत सरकारने चीनला चांगलेच फटकारले आहे. संपूर्ण जग ज्या गोष्टीवर सहमत आहे, त्या गोष्टीबाबत चीनने चिंतन केले पाहिजे आणि अशा प्रकारचे प्रयत्न भविष्यात करून नयेत, असा इशारा भारताने चीनला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली.
पाकिस्तान सातत्याने 'यूएनएससी'मध्ये काश्मीर प्रश्न पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये चीन हे पाकिस्तानला कायम मदत करत आले आहे. मात्र, इतर देश यामध्ये भारताच्या बाजूने असल्यामुळे पाकिस्तानचा हा डाव कायम फसत आला आहे. या १५ सदस्यीय समितीमधील इतर सदस्यांनी काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न असल्याचे सांगत यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. या समितीमधील बहुतांश सदस्यांचे असे मत होते, की काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही.