नवी दिल्ली -पूर्व लडाखमधील भारत चीन सीमेवर मागील काही महिन्यांपासून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने ठाकले आहेत. दोन्ही देशांमध्ये सीमावादासंबंधी लष्करी कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे चर्चेचे घोंगडे भिजत पडले आहे. सीमारेषेवरील वादावर अंतिम तोडगा निघाला नसतानाही २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चीनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनी लष्कराने केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने आता भारतानेच घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, नियंत्रण रेषेवरील सैन्याला चीनने आवर घालावा, अशी विनंती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज चीनच्या आक्रमक भूमिकेवर वक्तव्य केले. ते म्हणाले, "नुकतेच चीनने सीमेवर आक्रमक धोरण स्वीकारत घुसखोरीचा प्रयत्न केला. ही बाब राजनैतिक आणि लष्करी स्तरावरून चीनपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. चीनी सैन्याने सीमेवर शिस्त बाळगावी आणि कोणतीही भडकाऊ कृती करू नये."