बिजिंग :भारत-चीन सीमावाद चिघळलेला असतानाच दोन्ही देशांमध्ये आर्थिक युद्धही सुरू झाले आहे. भारताने दुसऱ्यांदा चिनी अॅपवर बंदी घातली आहे. पबजी गेमसह ११८ चिनी अॅपवर भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली आहे. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली असून भारताच्या निर्णयाचा निषेध केला आहे. भारताने अॅपबंदी निर्णयाचा पुन्हा विचार करावा, अशी विनंती देखील केली आहे.
चीनच्या व्यापार मंत्रालयाचे प्रवक्ते गाओ फेंग म्हणाले की, 'भारताने चिनी अॅप्सवर भेदभावपूर्व बंदी घातली असून राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवला आहे. भारताने आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा. चीन आणि भारताच्या व्यापाराचे दोघांनाही फायदे आहेत'.
चिनी कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कायद्यांचे पालन करावे, असे निर्देश चिनी सरकारने कायम दिले आहेत. परदेशी गुंतवणुकदार आणि कंपन्यांशी खुले आणि न्याय व्यापारी संबंध राहण्यासाठी भारत चीनबरोबर सहकार्य करेल, अशी आशा असल्याचे फेंग म्हणाले.
बंदी घातलेल्या अॅपमध्ये पबजी लाईट, वूई चॅट वर्क, कॅमेरा सेल्फी संर्दभातील विविध अॅप, म्युझिक प्लेअर एमपी 3, वेब ब्राऊझर, फोटो गॅलरी आणि अॅपलॉक यासारख्या विविध अॅप्सचा समावेश आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६९ ए या कलमांतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे.
यापूर्वी सरकारने बंदी घातलेल्या अॅपमध्ये पबजीचा समावेश नव्हता. दरम्यान, २९ जूनला सरकारने टिकटॉक, यूसी ब्राऊझर, कॅम स्कॅनर अशा ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारे हे अॅप्स असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.