नवी दिल्ली -चीनने भारतासोबतच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिकांची जुळवाजुळव केल्यामुळे भारतालाही प्रत्युत्तर दाखल सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करावे लागले, असे परराष्ट्र मंत्रालयाने आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी लडाख सीमेवरील मागील काही दिवसांत घडलेला घटनाक्रम सांगत चीनला 15 जूनला झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार धरले.
चीन भारताबरोबरच्या नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात सैनिकांची जुळवाजुळव करत आहे. हे दोन्ही देशांतील द्विपक्षीय कराराच्या विरोधात आहे. विशेषत: 1993 च्या करारानुसार भारत चीन सीमेवर शांतता राहण्यासाठी दोघांमध्ये करार झाला आहे. मागील काही दिवसांपासून सीमेवर गस्त घालत असताना चीनकडून अडथळा आणण्यात येत आहे. सीमेवर एकतर्फी बदल करण्यात येत आहेत, असे श्रीवास्तव म्हणाले.
मे महिन्याच्या सुरुवातील चीनकडून सीमेवर गस्त घालण्यात अडथळे आणण्यास सुरुवात झाली. तर मेच्या मध्यापासून चीनने सीमेवरील 'जैसे थे' परिस्थितीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. आम्ही लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चीनच्या या कृतीला विरोध केला. हे बदल कधीही स्वीकारण्यात येणार नाहीत असे भारताने स्पष्ट केले आहे. मात्र, दोन्ही देशांनी मान्य केलेल्या करारांकडे चीनने दुर्लक्ष केल्याचे श्रीवास्तव म्हणाले.
सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर 6 जूनला दोन्ही बाजूचे वरिष्ठ लष्करी अधिकारी चर्चा करण्यासाठी भेटले. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. नियंत्रण रेषेचा आदर करत दोन्ही देशांनी 'जैसे थे' परिस्थितीत बदल करु नये, असे या बैठकीत ठरल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.
चीन सर्व नियमांचे प्रामाणिकपणे पालन करेल अशी भारताला आशा आहे. त्यामुळे सीमेवर शांतता आणि सौदार्हपूर्ण राहील. तणावपूर्ण परिस्थितीत दोन्ही देशांचे संबध आणखी बिघडतील असे, श्रीवास्तव यांनी सांगितले.