चालणारी झाडे... बालदिनानिमित्त चिमुकलीनं बनवलं अप्रतिम गुगल 'डुडल'
गुगलने 'व्हेन आय ग्रो अप, आय होप' हा विषय डुडल बनवण्यासाठी लहान मुलांना दिला होता. त्यानुसार 'वॉकिंग ट्री' म्हणजेच चालणारी झाडे या संकल्पनेवर आधारित डुडल हरियाणा, गुरगाव येथील ७ वर्षीय दिव्यांशी सिंघल या चिमुकलीने तयार केले आहे.
नवी दिल्ली - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणजेच १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त गुगलने 'डुडल'च्या माध्यमातून मुलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गुगलने डुडल बनवण्यासाठी लहान मुलांना 'व्हेन आय ग्रो अप, आय होप' हा विषय दिला होता. त्यानुसार 'वॉकिंग ट्री' म्हणजेच चालणारी झाडे या संकल्पनेवर आधारित डुडल हरियाणा, गुरगाव येथील ७ वर्षीय दिव्यांशी सिंघल या चिमुकलीने तयार केले आहे.
"मी मोठी होईल तेव्हा झाडांना चालता किंवा हवेत उडता यायला हवं" या विषयावर दिव्यांशीने डुडल बनवलं होत. झाडांना चालता किंवा उडता आले तर त्यांची विनाकारण कत्तल होणार नाही, आणि ते लोकांसाठी मार्ग मोकळा करतील, असा विचार यातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे या अप्रतिम डुडलला गुगलने विजेता ठरवले. हे डुडल गुगलच्या वेबसाइटवर आज दिवसभर राहणार आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. लहान मुलावर त्यांचे प्रेम असल्याने त्यांना चाचा नेहरु म्हणून ओळखले जात होते. २७ मे १९६४ रोजी नेहरुंचे निधन झाले. त्यानंतर नेहरुंच्या स्मरणार्थ १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बालदिन केवळ भारतातच साजरा केला जात नसून जगभरात तो साजरा केला जातो. मात्र, जगातील विविध देशांमध्ये तो विविध दिवशी साजरा केला जातो.