मुंबई - देशभरामध्ये कोरोनाचे १८० रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ राज्यात सापडले आहेत. इतर राज्यांमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी उद्या ४.०० वाजता सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधणार आहे. या बैठकीला राज्यांचे आरोग्य मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत देशभरातील कोरोना प्रसारा संबधी तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार मिळून कोरोनाचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आरोग्य आणिबाणी हाताळण्यासाठी मंत्रीगटाचीही स्थापना केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शक्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. देशातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश कंपन्यांना देण्यात आले आहेत.