नवी दिल्ली -आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी महाराष्ट्र विकास आघाडीला सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांमार्फत त्यांनी हे ट्विट केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच आणखी काही ट्विट करत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
चिदंबरम यांनी महाराष्ट्र विकास आघाडीतील पक्षांना वैयक्तिक बाबी विसरून तिन्ही पक्षांनी एकमताने काम करावे, असे आवाहन केले आहे. तिन्ही पक्षांच्या दृष्टीने हिताचे निर्णय घ्या, असा सल्ला चिदंबरम यांनी दिला आहे. तसेच, शेतकरी, गुंतवणूकदार, रोजगार, सामाजिक न्याय, महिला आणि बालकल्याण यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
'संसदीय लोकशाहीच्या उत्क्रांतीला मानणारे निरीक्षक अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या, विविधांगी, बहुविध समाजांसाठी काम करणाऱ्या राजकीय आघाड्या स्विकारतात. कारण, अशा आघाड्यांमधून राजकीय पक्ष तडजोड करण्यास शिकतात. तसेच, सामान किमान कार्यक्रमावर सहमतही होतात,' असेही चिदंबरम आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाजपवर हल्ला चढवताना त्यांनी राष्ट्रपती कार्यालयाच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचाही आरोप केला. 'महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी सह्या मिळवण्यासाठी पहाटे चार वाजता राष्ट्रपती कार्यालयाला पाचारण करण्यात आले. हा या कार्यालयावरील एक प्रकारचा हल्लाच होता. यासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत वाट का पाहण्यात आली नाही,' असा सवालही चिदंबरम यांनी केला आहे.
संविधान दिवसाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणत्या आठवणी लक्षात ठेवणार, हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान घडलेल्या घटना संविधानाचा सर्वाधिक भंग करणाऱ्या घटना म्हणून लक्षात राहतील, असे त्यांनी म्हटले आहे. चिदंबरम सध्या ७४ वर्षांचे असून त्यांनी केंद्रात आघाडीची सरकारे बनवण्यात महत्वाचे योगदान दिले आहे.