नवी दिल्ली :कृषी कायद्यांबाबत माहिती देण्यास नकार देणाऱ्या नीती आयोगावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत या कायद्यांबाबत माहिती मागवली होती. मात्र, ती देण्यास नकार देण्यात आल्यामुळे चिदंबरम यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
ट्विट करत व्यक्त केली नाराजी..
"कृषीसाठी नीती आयोगाच्या मुख्यमंत्र्यांच्या समितीने २०१९च्या सप्टेंबरमध्ये विचारविनिमय केला. याच्या तब्बल १६ महिन्यांनंतर त्यांनी आपला अहवाल दिला. हा अहवाल अद्याप नीती आयोगाच्या गव्हर्निंग काऊंसिलसमोर सादर करण्यात आला नाही, आणि याचे कारण कोणालाच माहिती नाही." अशा आशयाचे ट्विट करत चिदंबरम यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
हा अहवाल आमच्याकडे सादरच करण्यात आला नसल्याचे सांगत, या अहवालाची प्रत मागणारी अंजली भारद्वाज यांची याचिका फेटाळण्यात आली. अॅलिसने हे पाहिले असते, तर याला ती 'क्युरिअसर अँड क्युरिअसर' म्हटली असती. अंजली भारद्वाज यांनी ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला यासाठी मी त्यांना सलाम करतो" असे चिदंबरम आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हणाले. (अॅलिस हे लेविस कॅरोलच्या 'अॅलिसेस अॅडव्हेंचर्स इन वंडरलँड' या पुस्तकातील पात्र आहे.)