रायपूर -छत्तीसगड राज्यात कवर्धा शहराजवळ मद्य वाहतूक करणार टेम्पोचा अपघात झाला. कबिरधाम जिल्ह्यातील रानीसागर भागात अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मद्याच्या बाटल्या लांबविल्या. मात्र, पोलीस आल्यानंतर फुकटची दारू लांबविणाऱ्यांना पळवून लावण्यात आले.
'100 बिअर आणि 100 व्हिस्कीचे बॉक्स घेवून टेम्पो डिलिव्हरी देण्यासाठी चालला होता. वाहनचालक कदाचित मद्यधुंद अवस्थेत असावा, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उलटली. चालक किरकोरळ जखमी झाला असून त्याला कवर्धा येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, असे निमेश सिंह या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही घटनास्थळी आले होते. ‘मद्याची किंमत सुमारे 20 लाख असून रायपूर येथून मद्यसाठा कौरा येथील एका दारूच्या दुकानात नेण्यात येत असल्याची शक्यता उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नितीन खंदुजा यांनी व्यक्त केली’. अपघातानंतर अनेक मद्याच्या बाटल्यांचे नुकसान झाल्याचे खंदुजा यांनी सांगितले.
पोलीस आणि अधिकारी घटनास्थळावर पोहोचेपर्यंत अनेकांनी दारूच्या बाटल्या लांबवल्या होत्या. मात्र, पोलीस आल्यानंतर नागरिकांना तेथून पळवून लावण्यात आले. दारुच्या बाटल्या नेण्यासाठी स्थानिकांनी आणि महामार्गावरील इतर वाहनचालकांनी गर्दी केली होती.