जशपूर -कोरोनाचा फैलाव देशभरात झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था मजबूत असायला हवी, हे सर्वांनाच उमगले आहे. शहरी भागात जरी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी ग्रामीण भाग विकासापासून वंचितच आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागात मुलभूत पायाभूत सुविधा पोहचल्या नसल्यानेे विकासापासून कोसो दुर असल्याचे चित्र आहे. चांगल्या रस्त्याअभावी छत्तीसगडमध्ये एका आजारी महिलेला रात्रीच्या अंधारात खाटेवर बसवून 4 किमी लांब पायी रुग्णालयात नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली. रात्रीच्या काळोखात चालताना नातेवाईकांना मशालीचा सहारा घ्यावा लागला.
ही घटना छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील तांबा कच्चर या दुर्गम खेडेगावात घडली. एक महिला मासिक पाळीसंबंधीच्या अडचणीमुळे आजारी होती. रात्रीच्या वेळी रुग्णवाहीका तसेच चांगल्या रस्त्याची सुविधा नसल्याने नातेवाईकांनी महिलेला खाटेवर बसून चौघाजणांनी उचलून मुख्य रस्त्यापर्यंत आणले. अंधारात मार्ग काढण्यासाठी माशालींची मदत घेतली. जवळील सरकारी दवाखान्यात महिलेला दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात महिलेला हलविण्यास सांगितले. त्यानंतर महिलेला खासगी वाहनाने दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. एवढी कसरत केल्यानंतरच महिलेला उपचार मिळाले.