रायपूर -छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून कुटुंबीयांसमोरच हत्या केली. नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यामध्ये मटवाडा गावात बुधवारी रात्री ही घटना घडली. सोमारु पोयम, असे मृत पोलिसाचे नाव आहे. मारहाणीत कुटुंबीयही जखमी झाले आहेत.
भयानक...! नक्षलवाद्यांनी घरात घुसून केली पोलिसाची हत्या - नक्षलवादी हल्ला बिजापूर
सहाय्यक शिपायी सोमारु पोयम याची दहा ते 12 नक्षलवाद्यांनी घरात घुसून हत्या केली. ही घटना बिजापूर जिल्ह्यात घडली.

सहाय्यक शिपायी सोमारु पोयम जिल्ह्यातील फरसगड पोलीस ठाण्यात कार्यरत होता. मात्र, आजारी असल्याने 10 जूनपासून सुट्टीवर होता. बुधवारी रात्री अचानक 10 ते 12 नक्षलवादी घरात घुसले. कुऱ्हाड आणि तिक्ष्ण हत्यारांनी त्यांनी सोमारुवर वार करायला सुरुवात केली. कुटुंबीयांनी सोमारुला वाचविण्याचा प्रयत्न केला असता घरातील दोघांवरही नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये तेही जखमी झाले, अशी माहिती पोलीस अधिक्षक कोमलचन कश्यप यांनी दिली.
या हल्ल्यात पोलिसाचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह भैरामगड येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कुटुंबातील जखमी सदस्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे.