उत्तरकाशी (उत्तराखंड) -अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले आहेत. आज दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी गंगोत्री आणि 12 वाजून 41 मिनिटांनी यमुनोत्री धाम येथील दरवाजे विधीवत उघडण्यात आले. यासह आजपासून चार धाम यात्रेला सुरुवात झाली.
यंदा कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे भाविकांना चारधाम यात्रेला जाण्याची परवानगी नाही. यामुळे चारधामचे दरवाजे उघडले असले तरी दरवर्षीप्रमाणे लोकांची गर्दी पाहायला मिळत नाही. तसेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच विधीवत पूजन करून हे सर्व दरवाजे उघडण्यात आले.
गंगोत्री आणि यमुनोत्री धाम यांचे दरवाजे विधिवत वैदिक मंत्र उच्चारांसह भावपूर्ण वातावरणात सोशल डिस्टन्स पाळूनच उघडण्यात आले. रोहिणी नक्षत्रात पूर्वा 12 वाजून 35 मिनिटांनी गंगोत्री मंदिराचे दरवाजे उघडले आणि अभिजीत मुहूर्तावर 12:41 वाजता यमुनोत्रीचे दरवाजे उघडले. यावेळी गंगा मातेच्या मूर्तीच्या विधीवत मंत्रोपचारासह मंदिरात स्थापना करण्यात आली.
गंगामातेच्या उत्सवाची पालखी शीतकालीन प्रवासादरम्यान मुखबा गाव आणि यमुना मातेची पालखी आपल्या शीतकालीन प्रवासासाठी खरसाली (खुशीमठ) गावात येते. कोरोना महामारी असल्याने यावेळी चार धाम यात्रेचा उत्साह कमी आहे.