महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत, इस्रोची नेत्रदीपक कामगिरी - chandrayaan2

सकाळी ११ वाजता इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. शिवन माध्यमांना इस्रोच्या कामगिरीविषयी माहिती देतील.

चांद्रयान २

By

Published : Aug 20, 2019, 10:37 AM IST

Updated : Aug 20, 2019, 12:53 PM IST

बंगळुरु -भारताचे चांद्रयान २ सकाळी ९.०२ वाजता चंद्राच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले आहे. याबरोबरच इस्रोला मोठे यश मिळाले आहे. १७३८ सेकंदांत शिताफीने हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यात शास्त्रज्ञ सफल ठरले आहेत. चांद्रयान मोहिमेतील हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा टप्पा होता.

इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. शिवन यांनी माध्यमांना इस्रोच्या कामगिरीविषयी माहिती दिली. 'चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याची वेळ जवळ आल्यानंतर आमची सर्वांची हृदये अक्षरशः थांबली होती. आम्हाला जे काही शक्य होते, ते सर्व प्रयत्न आम्ही केले आहेत. आताच्या टप्प्यात यश मिळाले आहे. हा भारताच्या इस्रोच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे. आता पुढे काय होईल, याचीही काळजी आहे. चंद्राची कक्षा बदलत राहते. ती गोल नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान पोहोचवण्यासाठी योग्य ठरेल अशा प्रकारची कक्षा निवडण्यात आली आहे. ७ सप्टेंबरला यानाचे लँडिंग होणार आहे. लँडिंगवेळी यानाचा वेग कमी करण्यासाठी क्लस्टरचा वापर करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान प्रथमच वापरण्यात येणार आहे. इस्रो जेव्हा एखादी गोष्ट करण्यास घेते, तेव्हा आमचे लक्ष्य ठरलेले असते. त्यानुसार सर्व काही करण्यात आले आहे,' असे शिवन यांनी सांगितले.

'चंद्रावर क्षार, पाणी आहे का? कोणते वायू आहेत का? तेथे जीवनाची शक्यता आहे का याच्या शक्यता पडताळल्या जातील. लँडिंगनंतर रोव्हरचा बाहेरचा कॅमेरा सुरू होईल. त्यानंतर तेथील छायाचित्रे मिळू शकतील. लँडिंगनंतर ५.८ तासांनी प्रत्यक्षात परीक्षणाला सुरुवात होईल,' अशी माहिती शिवन यांनी दिली.

Last Updated : Aug 20, 2019, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details