हैदराबाद -कोविड-१९ मुळे जगभरातील शैक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. चालू शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू ठेवण्यासाठी एक आश्वासक आणि सुरक्षित योजना तयार करण्यासाठी जगभरातील राष्ट्रे प्रयत्नशील आहेत. व्हिएतनाम आणि हाँगकाँगने हळूहळू शाळा उघडण्याला सुरवात केली आहे. तर, इटली आणि दक्षिण कोरियाने ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे. त्याचवेळी, भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ असल्याने शाळा आणि महाविद्यालयीन वर्ग पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या शाळांनी मागील वर्षाचा अपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाइन वर्गांच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता पुढील वर्गात पदोन्नती दिली आहे. उच्च शिक्षण संस्थांनी मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्र व राज्य सरकारांनी शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला असला तरी, वर्ग सुरू करण्याच्या तारखा सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत. सुरक्षित आणि प्रभावी शिक्षण देण्यासाठी डिजिटल आणि प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणाचा योग्य समन्वय साधने गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ऑनलाइन शिक्षण पारंपरिक शिक्षणापेक्षा बरेच वेगळे आहे. यामध्ये केवळ चालू अभ्यासक्रमाचे अनुसरण करणे पुरेसे होणार नाही. तर, अभ्यासक्रम आणि गद्य आणि पद्यांची योजना बदलणे अत्यावश्यक आहे. अलीकडेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई अभ्यासक्रमात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी केंद्र सरकार अभ्यासक्रम आणि शैक्षणिक कालावधीमध्ये कपात करणार असल्याचे संकेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयल यांनी दिले आहेत. कर्नाटक सरकारदेखील शाळांमधील अभ्यासक्रम कमी करण्याबाबत विचार करीत आहे. मात्र, अभ्यासक्रम कपात करणे वाटते तेवढे सहज आणि सोपे असणार नाही. विशेषत: गणित आणि सामान्य विज्ञान या विषयांच्या बाबतीत प्रत्येक धडा दुसर्याशी जोडलेला असतो. त्यामुळे, विद्यार्थ्यांना धडे समजण्यास अडचण येऊ शकते. अशावेळी स्थानिक गरजा अनुरूप आणि आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता होईल अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करणे हे शैक्षणिक तज्ज्ञांपुढे आव्हान असणार आहे.