देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सातत्याने विकासदर कमी होताना दिसतोय. विकासदर कमी कमी होत ५ टक्क्यांवर आला आहे.
अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारवर दबाव तीव्र आहे. विरोधक सातत्याने अर्थव्यवस्थेवरुन टीका करत आहेत. तर काहीजण केंद्र सरकारचे समर्थन करत आहेत. जास्त कर्ज घेण म्हणजे विकासाला चालना देणे असे त्यांचे म्हणणे आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास गेल्या सहा वर्षात सगळ्यात खालच्या पातळीवर आहे. खर्च, निर्यात आणि गुंतवणुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. देशांतर्गत खर्च हा चिंतेचा विषय आहे. राष्ट्रीय उत्पन्नात देशांतर्गत खर्चाचा वाटा 60 टक्के आहे.
पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जर जास्त मदत केली तर त्याचा अधिक फायदा होईल. त्यांच्या हातात जास्त पैसा येईल त्यामुळे त्याचा चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. देशात गरिब लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच अर्थव्यवस्थेच्या वाढसाठी गुंतवणुकीला चालणा देणे गरजेचे आहे. त्याद्वारे रोजगाराची निर्मिती होईल.
सरकार रस्ते, पूल, बंदरे इत्यादींसाठी जास्त खर्च करते. त्यामुळे सिमेंट स्टील आणि इतर बांधकाम साहित्यांची विक्री वाढते. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना नोकरी मिळते. गुंतवणूकीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते.
सरकारने २०१४ ते २०१९ या कालावधील पायाभूत सुविधांमध्ये ४ ट्रिलीयन डॉलरची गुंतवणूक केली आहे. मात्र, जीडीपी ८.२ टक्क्यांवरुन ७.२ टक्क्यांवर आला. गेल्या 45 वर्षांत बेरोजगारी सर्वांत जास्त आहे हे सरकारने मे 2019 मध्ये मान्य केलं. जुलै 2017 ते जून 2018 या काळात बेरोजगारीचं प्रमाण 6.1 टक्के होतं आणि देशातल्या 7.8 टक्के शहरी युवकांकडे नोकरी नाही.