नवी दिल्ली - मानव रचना शैक्षणिक संस्था येथे आत्मनिर्भर भारत वेबलॉगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास संबोधित केले. भारत सरकार विकास समर्थक आणि उद्योग समर्थक आहे. तसेच सरकार देशात अधिकाधिक रोजगाराची क्षमता निर्माण करुन दारिद्र्य निर्मूलन करू इच्छित आहे, असे ते म्हणाले.
भारतात प्रचंड बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, कच्च्या मालाची उपलब्धता आहे. तसेच सरकारही विकास व उद्योग समर्थक आहे. चार दिवसांपूर्वी फिलिप कॅपिटलने अमेरिकेत गुंतवणूकदारांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला. त्या वेबिनारमध्ये सुमारे 10 हजार गुंतवणूकदार माझ्याबरोबर होते. परतावा चांगला मिळत असल्याने त्यांना भारतात गुंतवणूक करायची इच्छा आहे. भारत गुंतवणूकीसाठी हे एक सुरक्षित ठिकाण आहे, असेही ते म्हणाले.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणूकीलाही प्रोत्साहन दिले जात आहे. आम्ही एमएसएमईसाठी ( लघु, छोटे व मध्यम उद्योग ) अधिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच एमएसएमईची व्याख्या देखील बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत. उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले गेले होते. परंतु, आता त्यांचे विलीनीकरण करण्यात आले असून त्यास 'उत्पादन व सेवा' असे नाव दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.