नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक स्थलांतरीत मजूर, कामगार, पर्यटक आणि विद्यार्थी देशाच्या विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अडकून पडले आहेत. त्यांना माघारी नेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली जारी केली आहे. मात्र, त्याआधीच विविध राज्यांनी आपल्या नागरिकांना स्वराज्यात आणण्याची व्यवस्था केली आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय जागे झाले असून त्यांनीही स्वगृही परतण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
अखेर गृहमंत्रालयाला जाग आली... लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसह विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार - undefined
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांना नेण्यात येणार आहे.
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात जाता येणार आहे. त्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी नोडल अथॉरिटी स्थापन करण्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. बसद्वारे नागरिकांना माघारी आणण्यात येणार आहे. मात्र, वाहतूक करताना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच घरी पोहचल्यानंतर १४ दिवस विलगिकरण करण्यात येणार आहे.
लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आल्याने अनेक मजूरांनी सरकारकडे वाहतूकीची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र, जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन सरकारने नागरिकांना केले होते. मात्र, देशातील कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना माघारी नेण्यासाठी गृहमंत्रालयाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. अनेक स्थलांतरीत कामगारांनी पायी हजारो कि.मी चे अंतर कापत घर गाठले आहे. अनेकांचा प्रवास करताना जीवही गेला. सरकारने जर आधीच त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली असती तर अनेकांचे नाहक प्राण गेले नसते. हाताचे काम गेल्याने मंजूर आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांचे हाल होत आहेत.