चेन्नई -तामिळनाडूत गाजत असलेल्या तुतिकोरीनमधील पिता-पुत्राच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) घेण्याची सूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. राज्य सरकारने ही माहिती दिली. पुराव्यांची अफरातफर होऊ नये म्हणून मद्रास उच्च न्यायालायाने तपास घाईघाईने गुन्हे शाखेकडे दिला होता. आता याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार आहे.
लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुतिकोरीनमधील पिता-पुत्राला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, पोलीस कोठडीतील छळामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांवर आहे. या प्रकरणी राज्यात संतापाची लाट पसरली असून पोलिसांना आरोपी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयराज आणि बेनिक्स यांच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहले होते. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास हातात घेत असल्याची सुचना जारी केली आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. या प्रकरणी संथानकुलम पोलीस ठाण्यातील 5 पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका पोलीस उपनिरिक्षकाचाही समावेश आहे.