महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील २५ कोटी लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहचण्यासाठी उजाडणार 'हा' महिना

कोरोनावरील लस कधी येणार याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. जुलै २०२१ पर्यंत देशातील २५ कोटी लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहचवली जाणार असल्याचे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

कोरोनावरील लस
कोरोनावरील लस

By

Published : Oct 4, 2020, 7:26 PM IST

नवी दिल्ली - कोरोनावरील लसीचे ४० ते ५० कोटी डोस खरेदी करण्याची भारत सरकारची तयारी सुरू आहे. त्याद्वारे जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहचवली जाणार आहे. त्यासाठी मानव संसाधन, प्रशिक्षण, पर्यवेक्षण इत्यादी आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. साप्ताहिक वेबिनार 'संडे संवाद'मध्ये ते बोलत होते.

नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती या संपूर्ण प्रक्रियेवर काम करत आहे. लसीची खरेदी आणि डोस देण्याची प्रक्रियेवर संपूर्ण लक्ष ठेवले जाणार आहे. खऱ्या गरजूला लस मिळते की, नाही हे त्यातून लक्षात येईल. देशात सुरू असलेल्या लसींच्या संशोधनांवरही ही समिती देखरेख करत आहे, असे मंत्री म्हणाले.

हेही वाचा -जम्मू काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा लष्कराने केला जप्त, दहशतवाद्यांना दणका

अत्यावश्यक रुग्णांना ही लस अगोदर देण्यात येणार असून यासाठी प्रत्येक राज्यांना त्यांच्याकडील अत्यावश्यक रुग्णांची माहिती मागवली आहे. या संकटकाळात कोरोना योद्धे म्हणून काम करत असलेल्या डॉक्टर, नर्स, रुग्णालय कर्मचारी, सफाई कामगार, आशा कार्यकर्त्या, पोलीस इत्यांदींना या लसी अगोदर देण्यात येतील. लसीचे वाटप हे पूर्ण नियोजनबद्ध आणि पारदर्शीपणे होणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये त्याविषयी माहिती दिली जाईल. या सर्व प्रक्रियेचा अभ्यास ऑक्टोंबर महिन्यात संपवण्यावर आमचा भर आहे, असे मंत्री हर्षवर्धन म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details