नवी दिल्ली - विशाखापट्टनम येथील एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत रासायनिक वायू गळती होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गुजरातवरून विशेष केमिकल विमानाने आणण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यास परवानगी दिली आहे. या केमिकलमुळे परिसरात पसरलेला वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
PTBC नावाचे ५०० किलो विशेष रसायन विमानाने गुजरातवरून आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनम येथे आणण्यात येणार आहे. दमन विमानतळावर हे रसायन उतरवण्यात येणार आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. गुजरातमधील वापी बंदरावरून हे रसायन विशाखापट्टनमला विमानाने आणण्यात येणार आहे.