कोलकाता - बंगालमधील अम्फान चक्रीवादळाने प्रभावीत भागाची केंद्रीय पथकाकडून आज(शुक्रवारी) पाहणी करण्यात येत आहे. राज्याच्या नॉर्थ आणि साऊथ 24 परगणा जिल्ह्यातील अनेक भागात केंद्रीय पथकाने वादळामुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.
सात सदस्यीय मंडळाची भेट
सात सदस्यीय केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. या पथकाचे प्रमुख गृहमंत्रालयातील सायबर आणि माहिती सुरक्षा विभागाचे संयुक्त सचिव अनुज शर्मा हे आहेत. तीन दिवसाच्या पाहणी दौऱ्यासाठी पथक काल सायंकाळी कोलकात्यात दाखल झाले.
पथक दोन भागात विभागले असून साऊथ आणि नॉर्थ परगाणा जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देत आहेत. हवाई पाहणी आणि जमीनीवरूनही नुकसाणीचा अंदाज पथक घेण्याची शक्यता आहे. शनिवारी केंद्रीय इंटर मिनिस्ट्रियल टीमही राज्याचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांना भेटली, त्यानंतर पथक दिल्लीला गेले.
केंद्राची बंगालला 1 हजार कोटींची मदत
अम्फान चक्रीवादळात सापडल्याने राज्यातील 98 जणांचा जीव गेला असून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे एक लाख कोटींचे नुकसान झाल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 22 मे ला पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी दोघांनीही नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. त्यानंतर राज्याला 1 हजार कोटी मदत निधी देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.