नवी दिल्ली - गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गाजलेले समिकरण आता देशातही नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असे जुळून आले आहे. पंतप्रधानानंतर महत्वपूर्ण खाते म्हणून गृहमंत्रीपदाकडे पाहिले जाते. राजनाथ सिंह यांच्याजागी निवड झाल्यानंतर अमित शाहांसमोर दहशतवाद, माओवादी आणि काश्मीर हे सर्वात मोठे मुद्दे असणार आहेत.
१. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत, याची काळजी घेण्याचे प्रमुख आव्हान अमित शाहांसमोर असणार आहे. दहशतवाद कशाप्रकारे सामोरे जायचे, याची नव्याने आखणी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
२. कलम-३७० नुसार जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा काढून घेण्याचे मोठे आव्हान असणार आहे. संघ परिवार आणि भाजपने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याची मागणी जूनी आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातही याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
३. मागील काही वर्षात महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि ओडिशा येथे माओवादी आणि नक्षलवाद्यांच्या कारवायांत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर माओवादी आणि नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान अमित शाहांसमोर असणार आहे.
अमित शाह यांनी १९८४-८५ साली भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम पाहिले होते. शाहांची कामगिरी पाहून त्यांना गुजरातचे सरचिटणीस आणि उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. या काळात त्यांची नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख झाली. यानंतर, मोदी-शाह यांनी मिळून गुजरातमध्ये निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिले. शाह यांनी १९८९ साली लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रचारसभांचे यशस्वी नियोजन केले होते.
शाह यांचे यशस्वी नियोजन बघून त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत घेण्यात आले. शाहांनी आपल्या मागील अनुभवाचा फायदा घेताना पक्षाला उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश येथे सत्ता मिळवून दिली. दक्षिण भारत आणि पूर्वांचल राज्यात भाजपला जागा मिळवून देण्यात अमित शाह यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. म्हणून पक्षात त्यांना 'चाणक्य' म्हणून ओळखले जाते.