भोपाळ - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र, यामुळे परराज्यातून आलेले अनेक मजूर अडकून पडले आहेत. सध्या सर्व बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मध्य प्रदेशच्या सतनामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी एक सेंट्रल किचन तयार करण्यात आले आहे. या स्वयंपाकघरात दररोज जवळपास ११ हजार लोकांचे जेवण तयार करण्यात येत असून जिल्हा प्रशासनामार्फत ते जेवण गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याची सोय करण्यात आली आहे.
परराज्यात अडकलेल्या गरजवंतांसाठी 'सेंट्रल किचन'ची सुरुवात, दररोज ११ हजार लोकांना जेवण सध्या कोरोना विषाणूने देशात धुमाकूळ घातला असून खबरदारी म्हणून लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र, याचा परिणाम गोरगरिबांवर पडला आहे. ज्यांचे पोट रोजंदारीवर भरते अशा लोकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. मध्य प्रदेशमध्येदेखील अडकून पडलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. तर, जिल्हा प्रशासनही अशा गरजवंतांना प्रत्येक मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अशातच, सतना जिल्ह्यामध्ये शहरातील स्थनिक सिविल लाईन केंद्रीय विद्यालय क्रमांक २ मध्ये शहरात अडकून पडलेल्या गोर गरिबांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सेंट्रल किचन सुरू करण्यात आले आहे. या स्वयंपाकघराचे दोन भाग करण्यात आले आहे. एका भागात उपलब्ध असणाऱ्या मशिनरीमधून भात, भाजी, दाळ तयार करण्यात येते. तर, दुसरीकडे पोळ्या आणि सुखी भाजी तयार करण्यात येते. यासाठी येथे जवळपास ४५ ते ५० लोकांची चमू कार्य करत आहे.
सेंट्रल किचनमध्ये दररोज ११ हजार लोकांसाठी जेवण तयार करण्यात येते. हे जेवण सतना नगर निगम द्वारा शहरातील नगरपरिषद, बिरसिंहपूर, जैतवारा, कोटर, नागौद, उचेहरा येथे नियमितपणे वाहनाद्वारे पोहोचवण्यात येते. सतनाचे आमदार सिद्धार्थ कुशवाहा यांनीही येथील सेंट्रल किचनचे निरीक्षण केले. देशावर ओढावलेल्या या संकटकाळी राज्यासोबतच जिल्हा प्रशासनाचे कार्य सुरुच आहे. मात्र, सध्याची कठिण परिस्थिती पाहता कोणी उपाशी राहणार नाही असे सहकार्य सर्व नागरिकांनीही करावे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.