भुवनेश्वर - बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अम्फान चक्रीवादळाने ओडिशाच्या किनारपट्टीला जोरदार धडक दिली. यामध्ये ओडिशाच्या किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले असून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाची पाहणी केली. त्यांनी आता ओडिशाला ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान मोदींनी ओडिशा आणि पश्चिम बंगालची हवाई पाहणी केली होती. त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत मदतीची घोषणा करण्यात आली. या मदतीबाबत स्पेशल रिलीफ फंडचे अध्यक्ष पी. के. जेना यांनी एक ट्विट केले. ओडिशा सरकारने पुनर्वसन कार्य हाती घेतले आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या १० जिल्ह्यामध्ये हे काम सुरू झाले आहे, अशी माहिती जेना यांनी दिली.