नवी दिल्ली - अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील पाटना येथील प्रकरण मुंबईला वळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस करण्याची बिहार सरकारची विनंती केंद्र सरकारने मान्य केली असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले.
मूळचा बिहारचा असलेला सुशांतसिंह राजपूत बांद्रा येथील अपार्टमेंटमध्ये 14 जूनला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या खोलीत आढळून आला होता. त्यानंतर बॉलिवूडमधील नेपोटीझ्ममुळे त्याने आत्महत्या केल्याचे आरोप अनेकांनी केले. त्यानुसार चौकशीदेखील करण्यात आली. त्यानंतर रियाने सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी 25 जुलैला बॉलिवूड अभिनेत्री आणि सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी पाटण्याऐवजी मुंबई येथे व्हावी, अशी याचिका दाखल केली. के. के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी प्रकरणाची चौकशी पाटणा येथेच व्हावी, अशी प्रतिवाद करणारी याचिका दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी आज (५ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात घेण्यात आली.
न्यायालयात नेमके काय घडले? -
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटण्यात न होता मुंबईत करावा, यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र, बिहार सरकार आणि सुशांतच्या वडिलांना त्यांचे जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुढील सुनावणीपर्यंत मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले. रियाच्या याचिकेला महाराष्ट्र सरकारने उत्तर दिल्यानंतर सुशांतच्या मृत्यूमागचे खरे कारण समजू शकेल, असेही न्यायालयाने म्हटले.
महाराष्ट्र पोलीस सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील सर्व पुरावे नष्ट करत आहेत, असा आरोप सुशांतच्या वडिलांची बाजू लढणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी केला. तसेच बिहार पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयात केली.
बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्यावर न्यायालय काय म्हणाले? -
बिहार पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा तसेच तपास करण्याचा कोणताही अधिकार नाही. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला एका राजकीय दिशेने नेत असल्याचा युक्तीवाद महाराष्ट्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आर. बसंत यांनी केला. मुंबई पोलिसांची चांगली ख्याती आहे. त्यामुळे बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन केले ते शोभले नाही, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले. याप्रकरणातील प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या चौकटीत राहूनच घडली पाहिजे, असेही न्यायालयाने बजावले. त्यावर आम्ही अगदी चोखपणे आमची जबाबदारी पार पाडत आहोत. मात्र, मुंबई पोलिसांवर अशाप्रकारचे आरोप लावणे हे चुकीचे असल्याचे महाराष्ट्र सरकारने न्यायालयात सांगितले.