नवी दिल्ली - तीस हजारी न्यायालयाच्या आवारात 2 नोव्हेंबरला पोलीस व वकिलांमध्ये शाब्दिक वादाला हिंसात्मक वळण लागले होते. त्या दिवशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी मोनिका भारद्वाज यांच्यासोबत वकिलाच्या पोषाखामध्ये असलेले काही लोक गैरवर्तन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तीस हजारी प्रकरण : महिला अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल
एक पोलीस अधिकारी मोनिका यांना गर्दीमधून बाहेर काढत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी काही वकिलांच्या पोषाखामध्ये असलेले लोक त्यांच्या मागे येत असल्याचे दिसत आहे. तिस हजारी न्यायालयामध्ये पोलीस आणि वकील यांच्यात वाद झाला. घटनेची माहिती मिळताच मोनिका भारद्वाज घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. बार कौन्सिल आणि दिल्ली पोलिस आयुक्तांना याप्रकरणी नोटीस पाठवल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
शनिवारी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयामध्ये पोलीस आणि वकील यांच्यात झालेल्या वादाला हिंसक वळण लागले. पोलिसांच्या गोळीबारानंतर संतप्त वकिलांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली असून वाहने पेटवून दिल्याची घटना घडली. यामध्ये 20 हून अधिक पोलीस जखमी झाले असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये सुरेंद्र वर्मा नावाच्या वकिलाला गोळी लागली होती. माध्यम प्रतिनिधींना देखील मारहाण झाल्याचीही माहिती आहे.