बंगळुरू - सी. सी. डी चे मालक व्ही. जी सिद्धार्थ हेगडे यांचा मृतदेह सापडला आहे. नेत्रावती नदी परिसरामध्ये ते काल (मंगळवारी) बेपत्ता झाले होते. आज (बुधवारी) नेत्रावती नदीच्या बॅकवॉटरमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. होयगी बझार, मंगळुरु येथे त्यांचा मृतदेह सापडला. व्ही. जी सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांचे जावई होते.
सीसीडीचे मालक सिद्धार्थ हेगडे यांचा मृतदेह सापडला आम्हाला मृतदेह सापडला आहे. याबबतची माहिती व्ही. जी सिद्धार्थ यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. मृतदेह वेगलॉक रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. पुढील तपास चालू आहे, असे मंगळुरुचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले.
व्ही. जी सिद्धार्थ हेगडे मंगळुरमधील एका पुलाजवळ बेपत्ता झाले होते. त्यांनतर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. शोध मोहिमेत एनडीआरएफ, कोस्टरार्ड आणि पोलीस पथकांनी सहभाग घेतला होता. बोटींद्वारेही त्यांचा शोध घेण्यात येत होता. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
आम्ही बंगळुरुवरून सकलेशपूरला टोयोटा कारमधून जात होतो. हे अंतर २२० की. मी आहे. मात्र, प्रवासामध्ये सिद्धार्थ यांनी गाडी मंगळुरुकडे घेण्यास सांगितली. नेत्रावती नदीच्या किनारी एका पुलाजवळ गाडी आल्यावर ते गाडीतून खाली उतरले आणि मला पुलाच्या दुसऱ्या बाजूला वाट पाहण्यास सांगितले. त्यांनतर ते बेपत्ता झाले, असे व्ही. जी सिद्धार्थ यांच्या गाडीचे ड्रॉयव्हर बसवराज पाटील यांनी पोलिसांना सांगितले.
ही घटना घडण्यापुर्वी त्यांनी सीसीडीच्या संचालक मंडळाला पत्र लिहल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये त्यांनी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्रास देत असल्याचे म्हटले आहे. तसेच व्यवसायात नफा होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच व्यवसायातील एका भागीदाराकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची माहिती मिळत आहे.