नवी दिल्ली - 'सीएए', 'एनआरसी'च्या विरोधात हिंसाचारामुळे दिल्लीत तणावाची परिस्थिती असल्याने खबरदारी म्हणून ईशान्य दिल्लीतील खासगी आणि सरकारी शाळा उद्या (बुधवारी) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) उद्या होणारी १० वी आणि १२ वीची वार्षिक परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. याबाबत नोटीस जाहीर करून मंडळाने उद्याचा पेपर पुढे ढकलल्याची माहिती दिली असून पेपर कधी घेतला जाईल याची माहिती नंतर दिली जाणार आहे. सीएएवरून या भागात तीन दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. उर्वरित दिल्लीतील परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार होणार आहेत.