हैदराबाद - कोरोनामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनने सर्वांना व्हर्च्युअल म्हणजेच ऑनलाईन शिक्षणाकडे वळण्यास भाग पाडले आहे. मात्र, भारत अजूनही या स्वप्नापासून दुर असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास सीबीएसई बोर्ड तयार नसल्याचे बोर्डाचे माजी अध्यक्ष अशोक गुलेरिया यांनी म्हटले आहे.
कोरोना आणि परीक्षा याविषयी त्यांनी ईटीव्ही भारतशी विशेष चर्चा केली. यावेळी गुलेरिया म्हणाले, अनेक घटकांची सरमिसळ असल्यामुळे आपले व्यवस्थापन ऑनलाईन परीक्षा घेण्यास अजूनतरी तयार नाही. सीबीएसई बोर्डात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, प्रत्येक शाळेकडे या सुविधा देण्याची क्षमता असेल, असे मला वाटत नाही. यासाठी कमीतकमी 3 ते 4 वर्षांची गरज आहे. सर्वसमावेशक आणि सतत मुल्यमापन करण्याची पद्धती आपल्याकडे हवी. त्यामुळे जर एखादी महामारी आलीच तर त्याआधारे विद्यार्थ्यांना गुण देता येतील.