पाटणा - बिहारमधील हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने हातात घेतला आहे. आत्तापर्यंत विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येते होता. मात्र, आज तपासाची सूत्रे केंद्रीय अन्वेषण विभागाने हाती घेतली आहेत. या बलात्कार आणि हत्येच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. हाथरस घटनेचा तपास सीबीआयकडून व्हावा, अशी शिफारस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्राकडे केली होती. त्यानुसार तपास सीबीयायकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
हाथरस प्रकरण नीट हातळले नसल्याचा आरोप योगी सरकारवर होत आहे. तसेच पोलीस आणि प्रशासनाने मीडिया आणि विरोधी पक्षाशी अरेरावी केल्यावरूनही योगी सरकार टीकेचे धनी बनले होते. पीडितेचा २९ सप्टेंबरला मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांच्या परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. तसेच राजकीय नेते आणि माध्यमांना हाथरस जिल्ह्यात येण्यास बंदी घातली होती. कायदा सुव्यवस्थेचे कारण प्रशासनाने पुढे केले होते. तसेच जिल्ह्यात आणि पीडितेच्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाने आम्हाला दम दिल्याचा आरोपही पीडित कुटुंबियांनी केला होता.