जयपूर - राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. भाजप आमदारांना फोडून काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. पोलिसांना काही फोन रेकॉर्डींगही मिळाल्या असून तपास सुरु आहे. मात्र, या प्रकरणी सीबीआयला राज्याच्या परवानगी शिवाय चौकशी करता येणार नाही. सीबीआयला आधी परवानगी घ्यावी लागेल, अशी नोटीस राज्याने जारी केली आहे.
दिल्ली स्पेशल पोलीस अॅक्ट-1946 अंतर्गत राज्यात चौकशी करण्यासाठी कलम 3 नुसार परवानगी घ्यावी लागले, अशी सुचना राज्याने जारी केली आहे. राज्याची ‘सामान्य संमती’ या कायद्यांतर्गत वैध नसून प्रकरणानुसार परवानगी घ्यावी लागेल, असे राज्याने म्हटले आहे. राजस्थानचे अतिरिक्त गृह सचिव रोहित कुमार सिंग म्हणाले की, यासंबंधीची प्रशासकीय तरतूद असून सीबीआयला काल (सोमवार) सूचना देण्यात आली आहे.