कोलकाता- शारदा चीट फंड घोटाळ्यात आरोपी असलेले माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने त्यांना नोटीस पाठवली असून चौकशीसाठी कोलकात्यातील सीबीआय मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (सोमवार) राजीव कुमार यांना अटक होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
याआधी सीबीआयने राजीव कुमार यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती. त्यामुळे त्यांनी देश सोडून जाता येणार नाही. तसेच आज सीबीआयचे पथक कोलकात्याला पोहोचले असून त्यांनी आधी कोलकाता पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली व याप्रकरणी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.
शारदा चीट फंड घोटाळा : राजीव कुमारांच्या अडचणीत वाढ, सीबीआय बंगालमध्ये दाखल दरम्यान, राजीव कुमार यांना बंगाल सरकारने परत सेवेत रूजू होण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीबीआय विरुद्ध बंगाल सरकार असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. मात्र, स्थानिक न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयानेही यावेळी राजीव कुमार यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे कुमार यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून त्यांना केव्हाही अटक होऊ शकते.
राजीव कुमार यांच्यावर शारदा चीटफंड घोटाळ्यात काही राजकीय व्यक्तींना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. यापूर्वीही सीबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीव कुमार यांची बाजू घेतली होती. त्यामुळे सीबीआय विरूद्ध बंगाल सरकार असा संघर्ष निर्माण झाला होता.