जयपूर- शहरातील मानसरोवर पोलीस स्टेशन हद्दीत २ मोटारसायकलवर आलेल्या ४ चोरट्यांनी गोळीबार करत एका खासगी कंपनीच्या रोखपालाला लुटल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ही घटना सेंट एंसलम शाळेच्या समोर असलेल्या गल्लीमध्ये घडली. चोरट्यांनी पैशांनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
जयपूरमध्ये रोखपालाला 'लुटले'; दुचाकीस्वार चोरट्यांनी गोळी झाडून पळवले ४५ लाख रुपये - चोरी
मिराज या खासगी ग्रुपचे रोखपाल नरेश सैनी हे दिवसभरात जमलेली रक्कम ५३ लाख रुपये बॅगेत भरुन जवळ असलेल्या परिचितांच्या घरी निघाले होते.
मिराज या खासगी ग्रुपचे रोखपाल नरेश सैनी हे दिवसभरात जमलेली रक्कम ५३ लाख रुपये बॅगेत भरुन जवळ असलेल्या परिचितांच्या घरी निघाले होते. त्यांनी एका बॅगेत ४५ लाख तर दुसऱ्या बॅगेत ८ लाख अशी रक्कम ठेवली होती. ते आपल्या सहकारीसोबत पायी चालत निघाले होते. तेव्हा ऑफिसपासून थोड्याच अंतरावर दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी नरेश यांच्या कंबरेवर गोळी झाडली. तेव्हा ते खाली पडले. मात्र त्यांनी बॅगा आपल्या हातातून सोडल्या नाहीत. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या हातातील एक बॅग हिसकावून पळ काढला.
चोरट्यांनी पळवलेल्या बॅगेत ४५ लाख रुपयांची रक्कम होती. दुसरी बॅगेतील ८ लाख रुपये नरेश यांनी पकडून ठेवल्याने ती रक्कम वाचली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला असून शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र अद्याप चोरट्यांचा तपास लागलेला नाही. निवडणुकीमध्ये पोलीस प्रशासन व्यस्त असल्याने, चोरट्यांनी चोरीचा धडाका लावला आहे.