नवी दिल्ली -सध्या देशभरात कोरोनाचे सावट पसरले आहे. या गंभीर महामारीला संपवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताहेत. तर, प्रशासनाला या संकटाच्या वेळी सामाजिक जबाबदारी म्हणून देशभरातून अनेकजण पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये पैसे जमा करत आहेत. परंतु, काही फसव्या वृत्तीचे लोक याचा फायदा उठवत आहेत. आधी खोट्या लिंक पाठवून फसवणूक करण्याच्या घटना पुढे येत होत्या. मात्र, आता परिस्थितीचा फायदा घेत चक्क पंतप्रधान सहाय्यता निधीच्या नावावर नकली युपीआय आयडी बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या खोट्या लिंकला समाजमाध्यमाद्वारे पसरवून लोकांना पैसे दान करण्याबाबत सांगितले जात आहे. तर, या लिंकद्वारे दान करण्यात आलेली रक्कम ही सरळ फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जाते. याबाबत सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे.
खरी आयडी (pmcares@sbi)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना या संकटकाळी देशाला आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याकरता pmcares@sbi अशा प्रकारची एक युपीआय आयडी तयार करण्यात आली आणि नागरिकांना त्यात पैसे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याद्वारे जमा करण्यात आलेला निधी हा सरळ पंतप्रधान सहायत्ता निधीमध्ये जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आता पंतप्रधान सहाय्यता निधी नावाने बनवण्यात आलेल्या युपीआय आयडीसारखी एक नकली आयडी तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.