नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी आयसीसच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्यानंतर अयोध्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. संशयित दहशतवाद्यास घातपाताच्या कारवायांसाठी अफगानिस्तानातील खुरासान येथून आदेश मिळत होते, अशी माहिती आहे.
अयोध्यामध्ये हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट; हाय अलर्ट जारी - अयोध्यामध्ये हाय अलर्ट
दिल्ली पोलिसांनी मध्यवर्ती भागातील रिज रस्ता परिसरातून सुधारित स्फोटक यंत्रांसह एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्यानंतर अयोध्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संशयित दहशतवादी उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमधील रहिवासी असून मोहम्मद मुस्तकीम असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून तो लखनऊमध्ये राहात होता. लखनऊसह बलराम जिल्ह्यातही त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांसह उत्तर प्रदेश विशेष तपास पथकही त्यांचा शोध घेत आहे. मुस्तकीम काश्मीरमधील दहशतवाद्यांच्याही संपर्कात होता. त्याच्याकडून 40 पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अयोध्यामध्ये राम मंदिर भूमिपूजन केल्याचा त्याला राग होता. त्यामुळे मोठा हल्ला करण्याची त्याने योजना आखली होती. तसेच उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक लोकांची हत्या झाल्याचाही त्याला राग होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.