हैदराबाद - 'रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी माझे व्हेंटीलेटर काढले आहे. मला श्वास घेता येत नाही. माझं हृदय बंद पडलं आहे. डॅडी आता मी मरणार आहे. बाय, बाय डॅडी', असा एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. यासंबंधीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हैदराबादमध्ये राज्य शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयामधील हा प्रकार आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला २३ तारखेला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, १० खासगी रुग्णालयांनी कोरोनाची चाचणी केल्याशिवाय दाखल करून घेण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी त्याला एका खासगी लॅबमध्ये नेऊन कोरोनाची चाचणी केली. मात्र, त्याच रात्री त्याची प्रकृती आणखीच बिघडली. त्यामुळे त्याला निझाम इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्स येथे नेण्यात आले. मात्र, तेथील प्रशासनाने छातीसंबंधित रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याला अखेर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याचे वडील रुग्णालय परिसरातच राहत होते. २६ तारखेला रात्री त्यांच्या मुलांनी त्यांना एक व्हिडिओ पाठवला. मात्र, त्यांनी तो व्हिडिओ रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पाहिला आणि मुलगा उपचार घेत असलेल्या वार्डामध्ये गेले. मात्र, त्यावेळी त्यांच्या मुलांनी अखेरचा श्वास घेतला होता. दुसऱ्या दिवशी रुग्णालय प्रशासनाने मुलाचा मृतदेह त्यांना सोपवला. अंत्यसंस्कार करून ते घरी परतले. त्यानंतर त्यांना मुलाचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. प्रशासनाने त्यांच्या पूर्ण रुग्णालयाला क्वारंटाइन केले. तसेच अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या ३० जणांचा शोध घेणे सुरू आहे.
मृताच्या पश्चात त्याची पत्नी, १२ वर्षीय मुलगी आणि ९ वर्षाचा मुलगा आहे. त्याने १० वर्ष सौदी अरेबियामध्ये नोकरी केल्यानंतर तो मायदेशी परतला होता. तसेच गेल्या दोन वर्षांपासून आपल्या कुटुंबीयांसोबत हैदराबादेत राहत होता.
माझ्या मुलासोबत झालं ते कोणासोबतही होऊ नये -