रांची -झारखंड सिंचन योजनेअंतर्गत एका ४०० किलोमीटरच्या महत्त्वाकांक्षी कालव्याचे काम तब्बल ४२ वर्षांनंतर अखेर पूर्ण झाले. या कालव्यामुळे गिरिदिह, हजारीबाग आणि बोकारो भागातील जवळपास ८५ गावांना पाणी उपलब्ध होणार होते. मात्र, उद्घाटनानंतर, अवघ्या २४ तासांच्या आतच हा कालवा वाहून गेला.
होय! झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या हस्ते या कालव्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर, अवघ्या २४ तासांमध्येच या कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे या कालव्याच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये तसेच शेतांमध्ये पाणी शिरले. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाने या घटनेसाठी चक्क उंदरांना जबाबदार ठरवले आहे.
कालव्याला पडलेले भगदाड आणि पिकांचे झालेले नुकसान पाहता, यासाठी जलसंपदा विभागातील मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, अरुण कुमार सिंह यांनी ट्विटरवरून दिली.
या समितीचा अहवाल २४ तासांमध्ये जमा केला जाईल. तसेच, कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे.
हेही वाचा : मोदींचे नाव घेताच पाक मंत्र्याला बसला '३७०'चा झटका!